महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्सची (MMNL) स्थापना झाल्यानंतरची पहिली सभा ३० नोव्हेंबर, २०१३ रोजी अॅम्सटलवीन मधील ‘De Meent’ ह्या town hall मध्ये पार पडली. सप्टेंबर, २०१३ मध्ये साजरा केलेल्या गणेश उत्सवात MMNL ची घोषणा करण्यात आली होती. नेदरलँड्स मधील मराठी मंडळींसाठी हि आनंदाची गोष्ट असल्यामुळे अर्थातच सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मंडळ स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच सभा असल्यामुळे ह्या सभेला विशेष महत्व होते. दुपारी २ वाजल्यापासून सभासदांची town hall मध्ये वर्दळ सुरु झाली. माननीय अतिथी श्री. Dr. मोहरीर, सौ. सरोज मोहरीर आणि Indian Embassy Netherlands चे पहिले सेक्रेटरी श्री. सतीश शर्माह्यांच्या आगमनानंतर सभा नियोजित वेळेप्रमाणे दुपारी २.३० वाजता सुरु झाली. श्री. अमित परुळेकर ह्यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. त्यांनी ह्या पूर्वी मराठी समूहाची झालेली संमेलने आणि इतर कार्यक्रम ह्या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांनी श्री. Dr. वसंत मोहरीर, सौ. सरोज मोहरीर आणि श्री. सतीश शर्मा ह्यांची ओळख करून दिली आणि श्री. Dr. मोहरीर ह्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. Dr. मोहरीर ह्यांनी आपल्या चव्वेचाळीस वर्षांच्या नेदरलँड्स मधील वास्तव्यातील बऱ्याच आठवणी आणि अनुभव सांगितले. त्याचबरोबर त्यांनी MMNL च्या पुढील वाटचाली करिता काही उपयुक्त सूचनाहिकेल्या.

Dr. मोहरीर ह्यांच्या प्रेरणादायी भाषणानंतर श्री. अनिरुद्ध कुसुरकर ह्यांनी एका presentation द्वारे MMNL ची उद्दिष्टे, कर्तव्ये, चालू घडामोडी आणि भविष्यातील कार्यक्रम सभासदांपुढे मांडले. ह्याच presentation मधून त्यांनी नेदरलँड्स मधील मराठी समूहाची काही आकडेवारी आणि वर्गवारी, MMNL च्या पुढील नियोजनातील तीन मुद्यांची कार्यसूची मांडली. 1. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मराठी संस्कृती आणि मूल्यांचे जतन करणे. 2. नेदरलँड्स मध्ये शिक्षण आणि व्यवसायानिमित्त येणाऱ्या/आलेल्या विद्यार्थांसाठी/लोकांसाठी मार्गदर्शन पुरविणे. 3. भारतातील आपली पाळेमुळे जपण्यासाठी आणि नेदरलँड्स मधील मराठी समुदायाला भारताशी जोडण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे.

श्री. अनिरुद्ध कुसुरकर ह्यांच्या presentation नंतर MMNL च्या वेबसाईट चे सौ. सरोज मोहरीर आणि श्री. सतीश शर्मा ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ह्या वेबसाईट मध्ये सभासद नोंदणी, ठळक घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रमांची छायाचित्रे, कार्यकारी समिती च्या सभासदांची माहिती ह्यांसारख्या उपयुक्त घटकांचा समावेश असल्यामुळे हि वेबसाईट MMNL चे ऑनलाईन जगातील अस्तित्व कायम ठेवेल. ह्या वेबसाईट चे काम श्री. सुधीर चोपडे ह्यांच्या नेतृत्वाखाली केले गेले. श्री. सुधीर चोपडे ह्यांनी ह्या वेबसाईट ची सभासदांना तोंडओळख करून दिली.

माननीय अतिथिंबरोबरच उपस्थित सभासदांनी ह्या वेबसाईटवर पुढील काही सूचना केल्या.
• कार्यकारी समितीच्या सभासदांचा संपर्क वेबसाईट वर उपलब्ध असावा.
• मराठी e-वर्तमानपत्रांची लिंक वेबसाईट वर उपलब्ध असावी.
• वेबसाईट वर ‘discussion forum’ ची सोय असावी.
• MMNL च्या सभासद नोंदणी मधेच स्वतःची profile समाविष्ट करण्याची तरतूद असावी.
• लहान मुलांकरिता एक वेगळा स्तंभ असावा.
• लोगो मधील बदल किंवा नवीन लोगो दिनांक २६ जानेवारी, २०१४ पर्यंत कळविणे.

वेबसाईट उद्घाटनानंतर उपस्थित सभासद आणि माननीय अतिथी ह्यांना एकूणच MMNL चे स्वरूप आणि कार्यपद्धती ह्यांविषयी सूचना/ बदल सुचविण्यास सांगितले गेले. श्री. शर्मा ह्यांनी केवळ मराठी समुदाया पर्यंतच मर्यादित न राहता इतर भारतीय समुदायाशी जोडण्याचा मोलाचा सल्ला ह्या वेळी दिला.

ह्याच वेळी केल्या गेलेल्या सूचनांमध्ये पुढील सूचनांचा समावेश होता:
• Indiawijzer’ ह्या अंकांमध्ये मराठी कार्याकारामांच्या बातम्या प्रकाशित कराव्या.
• गप्पांचा कट्टा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे जेणेकरून पुढील पिढी आपल्या संस्कृतीशी जोडलेली राहील.
• नेदरलँड्स मधील tax, immigration च्या कायद्यांमधील बदल सभासदांपर्यंत पोहचविणे.
• सभासद नोंदणी साठी प्रवेश शुल्क वाढवून नंतरचे सांस्कृतिक कार्यक्रम मोफत केले जावेत.
• मुलांकरिता संस्कार वर्ग सुरु करावेत.
• भारतातील इतर समुदायाशी जोडले जाण्यासाठी काही प्रसिद्ध कलाकारांना बोलावून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे.

त्या नंतर मंडळाचे अध्यक्ष श्री. विनय कुलकर्णी आणि कार्यकारी समितीच्या इतर सभासदांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात विचारलेल्या प्रश्नांचे/शंकांचे निरसन केले. केल्या गेलेल्या सूचना आणि बदल ह्यांची नोंद कार्यकारी सभासदांनी करून घेतली. चहा आणि अल्पोपहार ह्या नंतर सर्व सभासदांनी आपल्या कलागुणांची नोंद फलकावर केली. त्यानंतर नेदरलँड्स मध्ये गेली अनेक वर्षे वास्तव्य असलेले चित्रकार श्री. भास्कर हांडे ह्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि MMNL च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सभासदांनी एकमेकांशी परिचय करून देत/घेत ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.

– जाईली जोशी – पुराणिक