व्यापारी लोकांचा देश समजल्या जाणाऱ्या नेदरलँड्स ह्या छोटेखानी देशाने, अगदी पूर्वीपासून जगातल्या दूरदूरच्या देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. भारतही त्याला अपवाद नव्हता.ईस्ट इंडिया कंपनीची मूळ संकल्पनाही ह्यांचीच आणि जगातील पहिली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली ती ह्याच डच लोकांनी. ब्रिटिशांनी त्याची ‘कॉपी’ केली. ह्या डच ईस्ट इंडिया कंपनी पासून भारतीयांचा डच लोकांशी संबंध आला. भारतात व्यापारासाठी आलेले ग्वालांदेज म्हणजेच होलान्देज म्हणजेच हे डच लोक. शिवाजी महाराजांच्या, ई.स. १६६४ सालच्या सुरतेच्या स्वारीत ग्वालान्देजांच्या वखारीचा उल्लेख सापडतो.

भारताच्या पारतंत्र्याच्या काळात, ह्याच ग्वालान्देजांनी असंख्य भारतीय मजूर, आजच्या बिहार व उत्तर प्रदेशातून,आपल्या सुरिनाम ह्या वसाहतीत काम करण्यासाठी नेले आणि त्यातले बरेच आता नेदरलँड्सचे रहिवासी झालेले आहेत, मात्र ते हिंदी किंवा भोजपुरी भाषा बोलतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही मराठी मंडळीही नेदरलँड्स मध्ये दाखल झाली. कोणी फिलिप्स तर कोणी युनिलीवर मध्ये, काही मराठी विद्यार्थी ज्ञानार्जना साठी इथल्या महाविद्यालयात आले आणि पुढे त्याच महाविद्यालयात अध्यापनाचे काम करू लागले. कोणी डॉक्टर बनले तर कोणी इंजिनीयर तर काही जणांनी चक्क स्वत:चा व्यवसाय थाटला. सुरुवातीला आलेल्या मुठभर मराठी जनांच्या एकमेकांशी सतत गाठीभेटी होत असत. त्यात कोणी तबला वाजवी, कोणी हार्मोनिअम वर बोटे फिरवी.

काही जुनी मराठी मंडळी, नवीन आलेल्या मराठी जनांना आवर्जून भेटायला बोलवत असत,अधूनमधून करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. गणेश चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन अशा सारखे सण, मराठी जनांच्या गाठीभेटी वाढवायला मदत करत होत्या.पुढे ई.स. १९९० च्या दशकात भारतात ‘आयटी’ क्षेत्राचा उदय झाला आणि मराठी लोकांचे नेदरलँड्स मध्ये येण्याचे प्रमाण वाढीस लागले. १९९८ साली पहिले आणि २००५ साली दुसरे अशी दोन युरोपिअन मराठी संमेलने नेदरलँड्स मधल्या मराठी जनांनी घडवली. २०१० सालानंतर नेदरलँड्स मध्ये मराठी जनांची संख्या आणखी वाढली आणि आपले एखादे मंडळ असावे अशी भावना निर्माण झाली आणि २०१३ साली गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर काही उत्साही मंडळींनी महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सची स्थापना केली.

टप्याटप्याने मंडळाच्या कार्यक्रमांचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. सुदैवाने मंडळाला नेहमीच निस्पृह कार्यकर्ते लाभत आलेले आहेत त्यामुळे अवघ्या तीन वर्षात मंडळाने बरीच मोठी मजल मारलेली आहे.स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि लेखन, साहित्य, संगीत, नाटक, आणि नृत्याविष्कार ह्यावर भर आणि ह्या सर्वांवर प्रेम वाढावे म्हणून सतत चालणारा खटाटोप हे महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सचे आद्य कर्तव्य. ह्या सर्वातून महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स ला मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन जोमाने करता येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.