वसंत ऋतुचे आगमन झालेले आहे, कोकीळा आपल्या सुरेल सुरात पंचमात साद घालू लागली आहे, निसर्ग चैत्र पालवी फुलवु लागला आहे. अशीच सुरेल साद महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सने लंडन च्या तराना ग्रुपला घातली आणि दि. २९ मार्च, २०१४ रोजी आल्स्मीर च्या मिकाडो सभागृहात श्री. अरुण सराफ आयोजित ‘आनंद सोहळा’- तराना च्या सुगम संगीताची मैफिल पार पडली. निमित्त होते गुढीपाडव्याचे.
दुपारी १ वाजल्यापासूनच सभागृहात गडबड चालू होती. मंडळाचे स्वयंसेवक सभागृहाची सजावट, साउंड सिस्टमह्या कामांमध्ये व्यस्त होते. दुपारी साधारण २ वाजल्या पासून लोकांची वर्दळ सुरु झाली. दारावर उभारलेली गुढी,सभागृहात प्रवेश करताना गुलाबपाणी आणि सुगंधी अत्तराने उपस्थितांचे स्वागत केले गेले. स्टेजच्या सजावटीवरही मंडळाच्या स्वयंसेवकांनी खास मेहेनत घेतली होती. फूलं, वेली ह्यां बरोबरच स्टेजवरही एक गुढी उभारली होती. साधारण ३ वाजता प्रमुख पाहुणे श्री. वरीन्धर धूत (डिरेक्टर किर्लोस्कर ब्रदर्स युरोप B.V.) ह्यांच्या हस्ते फुलांच्या रांगोळीवरील समईचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाच सुवासिनींनी स्टेजवरील गुढीचे पूजन करत असताना तराना ग्रुपच्या कलाकारांनी गणेश वंदना केली.
‘प्रथमं तुज पाहता’, ‘घनघन माला’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशी अनेक सुरेल गाणी मैफिलीत रंग भरत होती. प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत होती. श्री. राजन शेगुंशी ह्यांच्या ‘जीवा शिवाची बैल जोड’ हे गाणे इतके अप्रतिम झाले कि प्रेक्षकांकडून Once more अपेक्षितच होते. ह्या नंतर मध्यंतरात चहापानाची सोय करण्यात आली होती.मध्यंतरानंतर सौ. अश्विनी काणे ह्यांच्या’ रेशमाच्या रेघांनी’ वर श्री. महेश बुलसारा ह्यांनी वाजवलेल्या तबल्याची साथीने प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. नेदरलँड्सचे उभरते कलाकार सुकल्प भोपले आणि अनुश्री जोशी ह्यांनी ‘ॐकार स्वरूपा’ आणि ‘रुपेरी वाळूत’ ही गाणी म्हणून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
श्री. अरुण सराफ ह्यांच्या ‘हृदयी रहा रे दयाघना’ अल्बम मधील काही गीते कलाकारांनी सादर केली. गदिमांपासून सुधीर मोघेंपर्यंत आणि लता मंगेशकर पासून आशा भोसले पर्यंत, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘एकाच ह्या जन्मी जणू’,‘शुक्रतारा मंदवारा’, ‘ने मजसी ने’ आणि अशी अनेक प्रकारची विविध गाणी सादर करण्यात आली. ‘ने मजसी ने’ ह्या गाण्याने तर काही प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. ह्या कार्यक्रमा दरम्यानच सुधीर मोघे ह्यांना त्यांच्या गाण्यांची medley सादर करून आदरांजली वाहण्यात आली.
‘विठ्ठल विठ्ठल’ ह्या भैरवी ने कार्यक्रमाची सांगता होत असतानाच खास अमराठी प्रेक्षकांसाठी श्री. राजन शेगुंशी ह्यांनी ‘लागा चुनरी मे दाग’ हे गाणे सादर केले आणि प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटाने गाण्याला दाद दिली. श्री. किरण देशपांडे ह्यांची सिंथेसायझरवरची साथ, जोडीला श्री. प्रसाद काणे व श्री. प्रशांत पोतनीस ह्यांच्या तबला वादनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. श्री. अमित परुळेकर ह्यांचे खुमासदार शैलीचे निवेदन, सौ. देवश्री आक्रे ह्यांनी सांगितलेल्या गुढी पाडव्याचे महत्व आणि सौ. धनश्री वझे ह्यांचा गुढी पाडाव्यावरील कवितेने कार्यक्रमाला चार चांद आणले. सौ. गौरी कुलकर्णी आणि श्री. विनय कुलकर्णी ह्यांनी बेबीसिटींग ची जबाबदारी सांभाळल्यामुळे समस्त पालकांना कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद घेता आला. श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी अशा खास मराठमोळ्या बेतावर ताव मारत पुढच्या कार्यक्रमाची चर्चा करत लोकं घरी परतले.
–जाईली जोशी – पुराणिक,पूर्वा कोरडे